बीड - विरोधकांना आता डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे वाट्टेल ते बोलू लागले आहेत. धनंजय मुंडे प्रत्येक सभेत बोलताना म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली विकासाची आकडेवारी खोटी आहे. जर आकडेवारी खोटी असेल तर जाहीर सभेत यावर वाद घालण्यासाठी मी तयार आहे, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये आयोजित महाजनादेश यात्रेत दिले.
हेही वाचा - विरोधकांनो कितीही यात्रा काढा.. किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही - मुख्यमंत्री
फडणवीस म्हणाले, आजपर्यंत मी मांडलेली आकडेवारी कधीही मागे घेण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. महाराष्ट्राचा विकास झाला आहे का नाही हे मी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक सांगेल. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या शेतकरी अडचणीत आहे. पण या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न इथला शेतकरी करत आहे. राज्यात ३०००० किमी रस्ते भाजपच्या काळात पूर्ण केले आहेत. याशिवाय राज्यात १८ हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केल्या आहेत.
हेही वाचा - गेवराईत शिवस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत; विजयसिंह पंडितांनी केले शक्तिप्रदर्शन
तरीही वाद घालायचा असेलच तर आमचे आमदार सुरेश धसच धनंजय मुंडेंसोबत वाद घालायला पुरेसे आहेत, असेही फडणवीस म्हणाले. तसेच शिक्षण, उद्योग या क्षेत्रात तरुण पिढी मोठ्या उत्साहाने काम करत आहेत. येणाऱ्या काळात अजून चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कोणीही हरवू शकणार नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
बीड येथे सोमवारी भाजपची महाजनादेश यात्रा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांची उपस्थिती होती. बीड येथे झालेल्या महाजनादेश यात्रेचे प्रास्ताविक भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले तर आभार राजेंद्र मस्के यांनी मानले.