बीड : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या वाद रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या पोशाखावर आक्षेप घेत तिच्यावर टीका केली होती. यादरम्यान उर्फीने देखील ट्विटरवर चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर टीका करत तिचे समर्थन करणाऱ्यांना देखील इशारा दिला आहे.
नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही : उर्फी जावेदचा हा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही. तसेच तुमच्यात जितका दम तितका लावा, मी घाबरणार नाही. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंसह ऊर्फिचे समर्थन करणाऱ्यांना इशारा दिला. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, माझे भांडण त्या बाईशी नसून तर तिच्या विकृतीशी आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. हे मी माझ्या घरासाठी करत नाही, समाजासाठी करत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही. मात्र आज अनेक जण तिला घेरण्यासाठी उभे ठाकत आहेत. कोणी सोबत नसले तरी मी हा लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा अंधारेंवर टीकास्त्र : प्रत्येक भाषणात सुषमा अंधारे सावित्रीबाईंचे नाव घेतात. व्यक्तिस्वातंतत्र्याच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही, यात काय चूक आहे. फॅशन कोण करत नाहीत ? सगळे फॅशन करतात. ही व्हिडिओ क्लिप मला याच महाराष्ट्रातील आईने पाठवली आहे. जिच्या मुलीवर दीड वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता, अशा आईने ही क्लिप मला पाठवली आहे. अन अशा विषयावर आवाज उठवला तर मी पदासाठी आवाज उठवला म्हणतात, लाजा आहेत का यांना ? असे म्हणत चित्रा वाघ यांनी पदावर बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर सडकून निशाणा साधला.
पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव : चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, की या विकृतीसाठी सर्वांना एकत्र यायला पाहिजे, मात्र तुम्ही माझ्यावर तुटून पडतात. मात्र मला आज त्रास होत आहे. घाणेरड्या पद्धतीने मला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी एकाकी नाही, मला महाराष्ट्रातील माता बघिनींनी सपोर्ट केला आहे. आज आवाज उठवला नाही तर हा नंगानाच महाराष्ट्रभर सुरू होईल. ही एवढी निर्लज बाई आहे की ते म्हणतेय की माझा हा पार्ट दिसला तर कारवाई होऊ शकते. वरून काही जण म्हणतात, ही दुसऱ्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ या विरोध करत आहेत. त्यांच्या धर्मात तर हिजाब वरून वाद सुरु आहे. त्यामुळे मला धर्मावरून वाद करायचा नाही. मात्र हा नंगानाच चालू देणार नाही. समाज सुधारण्यासाठी कुणी जर पुढे येत असेल आणि त्याची तुम्ही बदनामी करत असाल तर हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
हेही वाचा : Urfi Javed Raw : चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार
न्यायालयीन लढाई सुरू : चित्रा वाघ यांना मंत्री संजय राठोड यांच्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, संजय राठोड प्रकरणात आता माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे अशा विकृती विरोधात मी आवाज उठवेल. तुमच्यात जितका दम आहे तितका लावा, मी घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.