बुलडाणा - मोदी और योगी का एक ही नारा "ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बुलडाण्यात मोदींवर हल्ला चढवला. आपल्या भाषणात भाजप-सेनेचा खरपूस समाचार घेत सत्ताधाऱ्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचे ते म्हणाले.
शिवसेना-भाजप सरकारने मला जेव्हा अडीच वर्षे तुरुंगात ठेवलं तेव्हा माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलं. नवस केले, कोर्ट-कचेऱ्यापर्यंत गेलात, आणखी बरचं काही केलं, हे मी विसरू शकणार नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बुलडाण्याचे लोकसभेचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या जळगाव-जामोद येथील प्रचारसभेत व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर खासदार मेमन, गजभिये, रविकांत तुपकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, ज्योती ढोकणे, रामविजय बुरुंगले, प्रसेनजित पाटील, स्वाती बाकेकर, खालिक बासु विजय अंभोरे, गुलाबराव गावंडे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांना उद्देशून भुजबळ म्हणाले, तुम्ही म्हणाला होतात की सरकार निर्लज्ज आहे आणि आज तुम्ही का त्यांच्याबरोबर बसलात? तुम्हीच म्हणालात की पहारेकरी चोर आहे मग तुम्ही भागीदारी घ्यायला का बसलात ?
मग चोरी झालीच कशी?
सरकारच्या अपयशाविषयी सांगताना ते म्हणाले, भाजप सरकारने एकाच दिवसात नोटबंदी केली त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले, नोटबंदीमुळे बेकारी वाढली, छोटे उद्योग पडले. तुमचे गुजरात मॉडेल फेल झाले. १५ लाखांचा जुमला फेल, मेक इन इंडिया फेल आणि शेवटी तुमचं "राफेल". राफेलच्या कागदांची चोरी झाली, पण तुम्ही तर चौकीदार आहात. मग चोरी झालीच कशी? पेट्रोलची किंमत आता अडवणींच्या वया एवढी झाली आहे. यांचे सरकार परत आले तर पेट्रोलचे भाव MDH मसालेवाल्या काकांच्या वयाएवढे होईल.