परळी (बीड) - मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवतीच्या भाषणाचा जुना व्हिडीओ बदनामीकारक मजकुरासह एका तरुणाने फेसबुकवर पोस्ट केला. त्याखाली अन्य काही व्यक्तींनी अत्यंत हीन दर्जाच्या आणि अश्लील कॉमेंट केल्या. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून त्या तरुणावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणावर गुन्हा दाखल -
परळी तालुक्यातील एका युवतीने २०१७ साली मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अहमदपूर (जि.लातूर) येथील कार्यक्रमात मार्गदर्शनपर भाषण केले होते. यावेळी तिने तत्कालीन मुख्यमंत्री यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. पार्श्वभूमीवर अशोक राख या तरुणाने त्या युवतीच्या अहमदपूर येथील भाषणाचा व्हिडीओ स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून बदनामीकारक लिखाणासह पोस्ट केला. त्यानंतर त्या पोस्टखाली अनेकांनी अत्यंत अश्लील, हीन दर्जाच्या कॉमेंट केल्या. हे निदर्शनास आल्यानंतर त्या पीडित युवतीने वडील आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक लुगडे महाराज यांच्यासह सिरसाळा पोलीस ठाणे गाठून अशोक राख याच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून अशोक राख याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.