बीड - भर दुष्काळात जनावरांना चारा व पाणी देण्याचे काम आम्ही केले आहे. आता प्रशासन आमच्या बिलातून दंड स्वरूपात लाखो रुपये कापून घेत असल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असे म्हणत चारा छावणी चालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आकारलेला दंड नियमाप्रमाणे घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दंड आकारणी विरोधात छावणी चालक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
छावणी चालक संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने पैसे दिले नाहीत तरी देखील आम्ही चारा छावण्या चालवून जनावरांना चारा पुरवला. असे असतानाही प्रशासन अव्वाच्या सव्वा दंड आकारून आता छावणी चालकांचे नुकसान करत असल्याचा आरोप बीड येथील छावणी चालकांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने छावण्यांची संख्या सहाशेहून अधिक होती. छावण्यांच्या अचानक तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना दंड आकारला आहे. एवढेच नाही तर मागील बीड जिल्ह्यातील छावण्यांमध्ये मोठा घोळ झाला होता. जनावरे अधिकची दाखवून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावण्याचे काम काही छावणी बहाद्दरांनी केले होते. मात्र याचा फटका प्रामाणिकपणे छावणी चालवणाऱ्या छावणी चालकांनाही झाला होता. आता छावणी चालकांची बिले शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवली आहेत. मात्र, प्रशासन अव्वाच्या सव्वा दंड आकारत असल्याचे छावणी चालकांचे म्हणणे आहे.