बीड - बारामतीहून बीडकडे येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस उभ्या ट्रकवर धडकली. यात चालक-वाहकासह बसमधील ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.१४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
चालक विजय व्हरकडे यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम झाली असून वाहक पंकज कराड यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. उत्तरेश्वर चाटे (रा. संत नामदेव नगर, बीड), प्रीतम हुलजुते (रा. गेवराई), राजश्री पाचरणे, गोरख पाचरणे (दोघे रा. पिंपळगाव आळवा ता. जामखेड), पांडुरंग चव्हाण, शिवाजी वंजारे (दोघे रा. पाटोदा), शेख आबिदा, शेख आयशा (दोघी रा. बालेपीर, बीड) यांच्यासह इतर एकूण ३५ जणांचा जखमींमध्ये समावेश आहे.
चालक विजय व्हरकडे यांची प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे, भागवत शेलार, अशोक सोनवणे, उध्दव जरे, जयसिंग वाघ, लक्ष्मण जायभाये, मदन जगदाळे, चालक खय्यूम खान यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.