बीड- गेल्या वीस वर्षांपासून मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. असे असतानादेखील भाजपकडून माझ्यावर अन्याय झाला आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व पदवीधरांच्या स्वाभिमानासाठी औरंगाबाद विभाग, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहे. अशी माहिती अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
रमेश पोकळे म्हणाले की, भाजपने शैक्षणिक चळवळीत काम करत असलेल्या उमेदवाराला डावलल्याचा रोष संपूर्ण मराठवाड्यात आहे. मी भाजपचा उमेदवार नाही. तर मुंढे भक्तांचा उमेदवार आहे. त्यामुळे मराठवाड्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवत असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी यावेळी केला.
माझी लढत सतीश चव्हाण यांच्याशी आहे
भाजपकडून शिरीष बोराळकर जरी निवडणूक लढवत असले तरी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात असे कुठलेच काम केलेले नाही. त्यामुळे ही लढत माझ्यात व राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यातच आहे. असा भाजप उमेदवाराला टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला. पत्रकार परिषदेला भाजप मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सलीम जहांगीर, प्रवीण पवार यांची उपस्थिती होती.
निष्ठावंताला नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...
भाजपाचे निष्ठावंत असलेल्या रमेश पोकळेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रमेश पोकळे त्यांनी फेसबुकवरुन तशी घोषणा केली होती. पोकळेंची बंडखोरी शिरीष बोराळकर आणि भाजपाच्या अडचणी वाढविणार आहेत. रमेश पोकळे हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत.
दरम्यान, बीड पदवीधर निवडणुकीचे 1 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.