बीड - येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी राजेंद्र मस्के, भिमसेन धोंडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा यांच्यासह भाजपा गोटातील उमेदवारांची उपस्थिती होती.
'लोकशाही प्रक्रिया म्हणून निवडणुकीकडे पाहत होतो'
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना अगदी सर्वोच्च न्यायालयातदेखील यश न आल्याने आता उर्वरित ८ जागांसाठीच्या मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्ह्याने पाहिले आहेत. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणुकीकडे पाहत होतो.
'आम्ही शेतकऱ्यांचे हित पाहिले'
आम्ही ५ वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले. पण निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होत आहे. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय होत आहे. आमची ताकत जास्त असल्याने प्रशासक आणण्याची तयारी सुरु केली आहे, असे त्या म्हणाल्या. डायरेक्ट बोर्ड बनणारच नाही तर निवडणूक कशाला, असे म्हणत निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा मुंडे यांनी केली. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून ताकत लावली आहे.
'वेळोवेळी योग्य निर्णय घेतले म्हणूनच उभा राहिली'
जेव्हा पाच वर्षांपूर्वीही बँक भाजपाच्या ताब्यात आली होती. तेव्हा आम्ही बँक बुडवणाऱ्या अनेक लोकांना बाजूला ठेवून बँक पुन्हा नव्याने उभी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात ठेवीदारांना हजार रुपये द्यायलादेखील आमच्याकडे पैसे नव्हते. मात्र पाच वर्षात ही बँक पुन्हा उभी करण्याचे काम आम्ही केले आहे. गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची ही बीड जिल्हा बँक सुरळीत चालावी व खंबीरपणे उभी राहावी, हा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आहे. मात्र आता सत्तेचा गैरवापर करून पुन्हा या बँकेत काही लोक येऊ पाहात आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.