बीड - विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश लक्षात घेऊन भाजप बीड जिल्ह्यात लवकरच संघटानात्मक बदल करणार आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची देखील नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता आहे.
नवीन पदाधिकारी निवडी बरोबरच भाजप सदस्य नोंदणीच्या कामाला देखील गती देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ २ ठिकाणी म्हणजेच केज व गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उर्वरित बीड, परळी, माजलगाव व आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या सगळ्या परिस्थितीत आता पुन्हा नव्याने भाजप पदाधिकार्यांच्या निवडी करून पक्षाला भक्कम करणे गरजेचे असल्याचे पोकळे म्हणाले.
राज्य स्तरावरूनच नव्याने पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षात नव्याने काम करणाऱ्या तरुणांना संधी देणार आहे. यामध्ये सर्व तालुकाध्यक्ष व बीड भाजप जिल्हाध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे. या नव्या धोरणांमध्ये बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. इच्छुकांचे अर्ज मागवून घेतल्याचे पोकळे म्हणाले. यावेळी राजेंद्र मस्के, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, स्वप्निल गलधर, चंद्रकांत फड यांची उपस्थिती होती.