अंबाजोगाई (बीड) - खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे हाती लागला नाही. सोयाबीन धानाला सोन्याचा भाव असला तरी यंदा शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून तो तत्काळ मंजूर करून वाटप करावा, अशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीकविमा देण्यात आला. असेही राम कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले आहे.
सध्या कोरोनाचा काळ असून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था ठप्प आहे. मात्र,अशाही परिस्थितीत आमचा बळीराजा शेतात राबतो आहे. देशाची अर्थव्यवस्था तारणारा हा शेतकरी आहे. मागच्यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी खरीपाची पिके हाती लागली नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विमा भरलेला आहे. रब्बी पिकेसुध्दा अवकाळी वादळात सापडले. एकूणच काय तर शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पीक विमा जर लवकर वाटप झाला तर अशा संकटात मोठी मदत होईल. आज एक वर्ष झाले तरी विम्याची साधी दमडीही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असेही यावेळी राम कुलकर्णी यांनी सांगितले.