बीड - विधान परिषदेच्या 9 जागांसाठी भाजपच्या उमेदवार यादीत पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठींनी डावलल्याचे स्पष्ट होताच, बीड जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मागील चार दिवसात पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा राज्यात झाली होती. पंकजा यांना का डावलले? याची कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर पंकजा यांच्या राजकीय पुनर्वसनाची मोठी उत्सुकता स्थानिक समर्थकांमध्ये होती. भविष्यात मागच्या दाराने पंकजा मुंडे पुन्हा आमदार होतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये होता. अखेर शुक्रवारी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत बीडच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे, बावनकुळे यांना देखील भाजपने डावलले. याचा भाजपला फटका बसेल, की फायदा होईल, हे येणारा काळ सांगेल.
भाजप सरकारच्या काळात पंकजा मुंडे मंत्री असताना बीड येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेले नाराजी नाट्य व याशिवाय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित गोपीनाथ गडावरील कार्यक्रमांमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिकच्या समर्थकांनी दाखवलेला उत्साह हा पक्षश्रेष्ठींना खटकणारा विषय होता. याच कार्यक्रमात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करणार असल्याचे जाहीर केले होते. हा विषय भाजपला न रुचणारा असावा, याबाबत तेव्हा दबक्या आवाजात चर्चा देखील झाली होती.
पंकजा मुंडे या 'मास लीडर' आहेत. शिवाय एक महिला म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग मराठवाड्यात व महाराष्ट्रात इतर ठिकाणी आहे. याशिवाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. त्यांच्या याच बलस्थानामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षाने पंकजा मुंडे यांच्या बाबतीतला इतर कुठलाही विचार न करता त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीची उमेदवारी डावलली. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
मुंडे साहेब असते तर...
विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना झाली. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर मराठवाड्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी डावलले नसते अशी चर्चा देखील कार्यकर्ते करत आहेत.