बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यातील दरडवाडी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारूडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३ दिवसीय भारूड महोत्सव रंगणार आहे. अशी माहिती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक वामन केंद्रे यांनी दिली. ते शासकीय निवासस्थानावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. हा महोत्सव ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे.
केंद्रे पुढे म्हणाले, की गेल्या ५ वर्षांपासून दरडवाडी येथे सुप्रसिद्ध भारूडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारुड स्पर्धेचा कार्यक्रम घेतला जातो, यासाठी ४० हून अधिक संघाची नोंदणी झाली आहे. या भारुड महोत्सवाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. डी. सिंह. हभप महादेव महाराज चाकरवाडीकर, विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांची उपस्थिती राहणार आहे. तर समारोप बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरडवाडी येथे होत असलेल्या महोत्सवात अंदाजे एक हजार भारुड कलावंत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. हा महोत्सव स्पर्धात्मक असून त्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघास प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अनुक्रमे ३० हजार, २० हजार व १० हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही वामन केंद्रे म्हणाले. यावेळी इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांची उपस्थिती होती.