बीड - स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पक्षाच्या ताब्यात तो पक्ष जिल्ह्यात सर्वात बलशाली असतो. हे सूत्र लक्षात घेऊन बीड येथील जिल्हा परिषद अध्यक्ष पद व पंचायत समित्यांचे सभापती पद काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. काही जिल्हा परिषद सदस्य सहलीवर गेले आहेत. तर, काहींची पळवापळवी झाली आहे. हाच प्रकार पंचायत समिती सभापती निवडीच्या बाबतीतही आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या पळवापळवीचे राजकारण पेटले आहे.
या सगळ्या राजकीय घडामोडींची चार दिवसांपासून चर्चा राज्यभर होत आहे. बीड जिल्हा परिषदेत भाजप असो की राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांना शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेकडे चार जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्यामध्ये एकजूट कायम टिकली तर तेच किंगमेकर असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
येत्या 30 डिसेंबरला बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे सभापती निवडले जाणार आहेत. तर, 4 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या निवडीच्या संदर्भाने माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची एक बैठक देखील घेतलेली आहे. दुसरीकडे आतापर्यंत दूर आहे, अशी वाटणारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी तयारीला लागली आहे. एकूण 60 जिल्हा परिषद सदस्यांची बीड जिल्हा परिषद आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे ओबीसी महिलासाठी राखीव आहे. कोण जिल्हा परिषद अध्यक्ष होतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे. बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला हादरा बसला असून शिवसंग्रामच्या स्वाती वायसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
असे आहे 'झेडपी'तील बलाबल-
भाजपकडे स्वतःच्या 20 पैकी 18 (आजबे यांचा राजीनामा आणि सतीश शिंदे राष्ट्रवादीसोबत आहेत), भारतीय संग्राम परिषदेच्या चारही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते 4, काँग्रेसचे टी.पी.मुंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा 1 आणि मागीलवेळी भाजपसोबत असलेले राजेसाहेब देशमुख, आश्विनी निंबाळकर असे 26 सदस्य आहेत.
राष्ट्रवादीकडे स्वतःचे 21, काकू नाना आघाडीचे 2 (संदीप क्षीरसागर यांचा राजीनामा), काँग्रेसचे 1 आणि सतीश शिंदे 1 असे 25 सदस्य आहेत. मात्र, अक्षय मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुंदडा समर्थक असलेला राष्ट्रवादीचा 1 सदस्य काय निर्णय घेईल हे आज सांगता येणार नाही. परिस्थितीत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित समर्थक 4 सदस्य महत्वाचे ठरू शकतात.