बीड: हा चार तोंडाचा गणपती आहे. याची ब्रह्मदेवाच्या हाताने स्थापना झालेली आहे. पाचवा जो गणपती आहे तो पालखी मधील आहे. चार सीमा आहेत त्या सीमेवरती चार गणपती आहेत. त्यामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चार सीमावर चार गणपती असे एकूण मिळून नऊ गणपती होतात म्हणून याला नवगण असे म्हणतात.
काय आहे आख्यायिका: या ठिकाणी ब्रह्मदेवाने एक यज्ञ सुरू केला होता. त्या ठिकाणी वाकणनाथ म्हणून महादेवाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी हवन चालू होते. हवन चालू असताना या हवनांमध्ये राक्षसांनी विघ्न आणले होते. ब्रह्मदेवाने गणपतीचे रूप धारण करून, त्या राक्षसांचा नाश केला. त्यानंतर ही नव गणांची राजुरी स्थापन झाली. पूर्व भागामध्ये तिप्पट वाडी या ठिकाणी पहिला गणपती आहे. उत्तर बाजूला शिरापूर या गावांमध्ये दुसरा गणपती आहे. तिसरा गणपती पश्चिममेला राधाबाई या ठिकाणी आहे. चौथा गणपती दक्षिण बाजूला लिंबा या ठिकाणी संगमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. असे चार सीमेवर चार गणपती आहेत. शुद्ध प्रतिपदा या काळामध्ये गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदेला द्वार द्वितीयेला, तृतीयेला द्वार, चतुर्थीला द्वार असते. तसेच पंचमीला जन्मकाळ असतो. संध्याकाळी जन्माचे किर्तन होते. पंचमीला व षष्ठीला द्वार असत. सप्तमीला गणपतीचा काला असतो. अष्टमीला विसर्जित होते. या दिवशी पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपूर्ण गावभर होते. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला या ठिकाणी अभिषेक होतात. या ठिकाणी दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात.
काय आहे या गणपतीचे वैशिष्ट्य: आपण अनेकवेळा अनेक ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातो. मात्र त्या ठिकाणी उजव्या किंवा डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतो. मात्र नवगणराजुरीचा या गणपतीची मूर्ती आहे, ती एकच असून चारही बाजूने गणपती एकमेकाला जोडले गेलेले आहेत. चारही बाजूंच्या दिशांना या गणपतीचे तोंड आहेत. पूर्णतः ही मूर्ती शेंद्राने माखलेली आहे. या मंदिराचे शिल्प फार पुरातन काळातील असून भव्य दिव्य असे मंदिर आहे. अत्यंत सुंदर रंगरंगोटी मंदिरात करण्यात आली आहे.