बीड - मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये बिगर लग्नाची मुले अगोदर शोधायची नंतर त्यांच्याशी सलगी करून त्यांना लग्न करून देण्यासंदर्भात आमिष दाखवायचे. एक-दोन लाख रुपये घेऊन टोळीतीलच एका मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून द्यायचा. आठवडाभरानंतर टोळीतील एखाद्या बनावट पतीला त्या लग्न लावून दिलेल्या मुलाला फोन करायला लावायचा व तू माझ्या बायकोला पळवून नेऊन लग्न केले आहेस. तुझ्यावर मी बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे. असे म्हणत धमकावून दोन्हीकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बनावट लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारच्या रॅकेटपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी, की बीड जिल्ह्यातीलआष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका तरूणाचा विवाह लातूर येथील एका महिलेसोबत आठ दिवसापूर्वी झाला होता. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशीपासून सदरील महिला दोन लाख रुपयांची मागणी करून ते न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत असल्याची फिर्याद तरुणाने आष्टी पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी भ्रमणध्वनीवरील संभाषणावरून तक्रारीची शहानिशा केली. तडजोडीअंती 80 हजार रुपये देण्याचे सदरील तरुणाने कबूल केल्यानंतर आष्टी शहरातील शिराळ रस्त्यावरील चौकात सापळा रचण्यात आला. या वेळी चारचाकी वाहनातून आलेल्या महिलेसह एका पुरूषाने मागणी केल्याप्रमाणे 50 हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.रंगेहाथ ताब्यात
चार जिल्ह्यात उभारले जाळे
या प्रकरणात जेव्हा पोलीस तपास खोलवर गेला तेव्हा आरोपींनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, जिल्ह्यात आरोपींनी खास महिला व पुरुष यांची नियुक्ती या कामासाठी केली आहे. दररोजच्या चालण्या-बोलण्यामधून एखादा असा मुलगा हेरायचा, ज्याचे लग्नाचे वय निघून चालले आहे व तो लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. त्याच्याशी सलगी करून त्याला लग्न करून देण्याचे आम्ही दाखवायचे. लग्न करून देण्यासाठी म्हणून लाख-दोन लाख रुपये अगोदर उकळायचे. त्यानंतर लग्न लावून द्यायचे व पुन्हा चार-आठ दिवसाने टोळीतील अशाच एखाद्या बनावट नवऱ्याला त्या लग्न केलेल्या मुलाला फोन करून धमकी द्यायची व त्याच्याकडूनही पुन्हा त्याच्या परिस्थितीनुसार पैसे उकळायचे हा धंदा मागील वर्षभरापासून या टोळीचा सुरू होता. मात्र अखेर आष्टी पोलिसांनी आरोपी अजय महारूद्र चवळे (28, रा. खंडापूर, जि. लातूर), सोनाली गणेश काळे (30, रा. नांदेड, ह, मु. लातूर) यांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यात बनावट विवाहाचे रॅकेट आले असून हे रॅकेट पैसे घेऊन लग्न लावते. दोन-तीन दिवस महिला घरी राहते. पुन्हा नवऱ्या मुलाला अंगाला हात लावू न देता त्यांना धमकी देऊन तुम्ही माझा छळ करता, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्याची धमकी देते. समाजाच्या भितीमुळे पोलिसांकडे तक्रार करण्यास कोणी येत नसल्याने याची माहिती होत नाही. तरी नागरिकांनी बळी न पडता पोलिसांना कळवावे, असे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.'पोलिसांत तक्रार करा'