बीड - जिल्ह्यात आज घडीला आठशेहून अधिक टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. परळी तालुक्यात देखील मोठी पाणी टंचाई आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत योग्य नियोजनाच्या बळावर एका शेतकऱ्याने अल्प पाण्यावर द्राक्षाची बाग फुलवली आहे. त्यांच्या या कष्टाचे आणि पाणी बचतीच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सबदराबाद येथील शेतकरी सुग्रीव मुंडे यांनी दीड एकर क्षेत्रावर जैविक शेतीचा प्रयोग यशस्वी करत अल्प पाण्यावर द्राक्षाची बाग फुलवली आहे. आज घडीला सुग्रीव मुंडे यांची द्राक्षे परदेशात विक्रीसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिद्द असली की कोणतेच काम अशक्य नसते. यावर शंभर टक्के विश्वास ठेवून सुग्रीव मुंडे यांनी अल्प पाण्याचे योग्य नियोजन केले ठिबकद्वारे द्राक्षाचा बागेला पाणी दिले.
विशेष म्हणजे कुठलेही रासायनिक खत, औषधे अथवा द्रव्यांची फवारणी न करता जैविक खते द्रव्य वापरून त्यांनी जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. पाणी अल्प असल्यामुळे शेती करणे अवघड आहे. मात्र, योग्य नियोजनामुळे अल्प पाण्यात देखील त्यांनी एकरी १५ टन असे चार लाखाचे उत्पन्न दुष्काळी परिस्थितीत घेतले. त्यांनी घेतलेल्या द्राक्षांची विक्री युरोप मध्ये व स्थानिक बाजारपेठेत देखील होत असल्याचे सुग्रीव मुंडे यांनी सांगितले. उत्कृष्ट शेती बद्दल सुग्रीव मुंडे यांना विविध राज्य शासनाच्या कृषी विभागाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
मुबलक पाऊस झाला तरी भूगर्भाची पाणीपातळी घटली असल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती यापुढे सतत निर्माण होणार आहे. ही मानसिकता ठेवूनच शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून याशिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन शेती करण्याची गरज असल्याची अपेक्षा सुग्रीव मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवली. शेतात एक बोअर व विहीर आहे. दीड एकर क्षेत्रावरील द्राक्षाच्या बागेला पाणी पुरेल एवढेच त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे. पाण्यावर उत्कृष्ट शेती करणारे सुग्रीव मुंडे हे इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहेत.