परळी - गेल्या 20 वर्षांपासून जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने पोलीस पाटील पदांची भरती करावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष माऊली मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
'जिल्ह्यातील 80 टक्के पदे रिक्त'
महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये पोलीस पाटील पदांसाठी भरती घेण्यात आली. मात्र बीड जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून ही भरती रखडलेली आहे. जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. परळी तालुक्यात 90 गावे आहेत, त्यामध्ये केवळ 7 पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलीस पाटील हा गाव आणि पोलीस प्रशासन यामधील दुवा म्हणून कम करतो, त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था टिकून राहाते. पोलिसांवरील ताण कमी होतो, त्यामुळे तातडीने पोलीस पाटलांची भरती करण्याचा निर्णय घ्यावा असे निवेदन माऊली मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. दरम्यान जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रीक्त पदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले असल्याची माहिती माऊली मुंडे यांनी दिली आहे.