बीड - सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत बीड लोकसभा मतदारसंघात वृत्तपत्रे व माध्यमांद्वारे प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी नोटीस बजावली आहे.
भारतीय जनता पक्षाने सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा फोटो बीड लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराच्या जाहिरातीमध्ये अनधिकृतरित्या वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार निवडणूक कक्षास प्राप्त झाली होती. ही जाहिरात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने आपले म्हणणे सादर करावे, अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांनीही एका दैनिकामध्ये दिनांक १७ एप्रिलच्या अंकात मुखपृष्ठावर प्रसिद्ध केलेल्या वृत्तांच्या अनुषंगाने तक्रार करणारा अर्ज निवडणूक कार्यालयास प्राप्त झाला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सोनवणे यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.