बीड - बीडमध्ये 60 ते 70 एचआयव्ही बाधित अनाथ मुलांच्या आरोग्यासाठी इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे व संध्या बारगजे हे दांपत्य गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहे. शासनाच्या कुठल्याही मदती शिवाय अनाथ मुलांचा सांभाळ केला जात आहे. विशेष म्हणजे एचआयव्ही बाधित असलेल्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असते. यातच सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील शासनाच्या आरोग्य विभागाची पाहिजे तशी मदत इन्फंट इंडिया येथील अनाथ एचआयव्हीबाधित मुलांना मिळत नाही अशी खंत इन्फंट इंडियाचे प्रमुख दत्ता बारगजे यांनी व्यक्त केली आहे.
मागील पंधरा वर्षापासून दत्ता बारगजे व संध्या बारगजे हे बीड तालुक्यातील पाली येथील डोंगर माथ्यावर इन्फंट इंडिया संस्थेच्या माध्यमातून 60 ते 70 एचआयव्ही बाधित अनाथ असलेल्या मुलांचा सांभाळ करत आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी अनेक दानशूर दात्यांची मदत इन्फंट इंडियाला मिळत होते. मात्र, आता कोरोनामुळे मदत करणारे दाते देखील अडचणीत असल्याने, एचआयव्ही बाधित मुलांच्यासाठी होणारी मदत कमी झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या एचआयव्ही बाधित मुलांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे त्यांना इतर साथीच्या आजाराची लागण होऊ शकते. या सगळ्या बाबींची काळजी आम्ही घेत असल्याचे दत्ता बारगजे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले आहे.
दानशूर व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा
मुलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना सकस आहार वेळेवर देणे आवश्यक असते. परंतु सध्या लॉकडाऊन आहे. अनेक समाजातील दानशूर व्यक्ती स्वतःच अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत या मुलांच्या आरोग्याचा व सकस आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, असे विनंतीही दत्ता बारगजे यांनी केली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री