बीड - केंद्र सरकारकडून राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. या विरोधात युनायटेड फोरम फॉर बँक युनियन संघटनेने बंद पुकारला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (दि. 15 मार्च) बीड शहरातील तसेच आष्टी, परळी, गेवराई आदी ठिकाणच्या बँका बंद होत्या. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली.
सरकारी बँका तोट्यात आहेत. बँका तोट्यात येण्याचे मूळ कारण म्हणजे मोठमोठ्या उद्योजकांना दिलेले कर्ज व ते उद्योजक केंद्र सरकारमधील मंत्र्यांना हाताशी धरून कर्ज मंजूर करून घेतात व नंतर पुढे कर्ज थकीत झाले की, बँक तोट्यात जाते एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा परिणाम सुरळीत चालणाऱ्या बँका तोट्यात जात आहे. आता केंद्र सरकार या बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप बँक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सरकारी बँका खासगी झाल्यावर त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यापारी व कारागीर यांना होणार्या पतपुरवठ्यावर होणार आहे. याचा परिणाम सरळ देशाच्या विकासावर होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात प्रादेशिक, ग्रामीण बँक अधिकारी व कर्मचारी संघटनाचे राज्यातील 16 जिल्ह्यातील सभासद दोन दिवसांच्या संपात उतरले आहेत. सोमवारी संघटनेच्या वतीने अंबाजोगाई व बीड येथे सर्व संघटनांच्या एकत्रित निदर्शनात सहभाग नोंदवला. महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस किशोर धर्मराज लटपटे यांच्यासह बँक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला.
हेही वाचा - बीड: जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
हेही वाचा - बीडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रविवारी २६० नव्या रुग्णांची भर