आष्टी (बीड) : ‘शहराला रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. अण्णा तुम्हीच काय ते करु शकता’, अशी आष्टी येथील कोरोना सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता विनंती केली. यानंतर तत्काळ आमदार सुरेश धस यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करत शनिवारी पहाटे 100 रेमडेसिवीरची व्यवस्था केली. यामुळे शुक्रवारची संपूर्ण रात्र सुरेश धस यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही जागून काढली आणि रेमडेसिवीर मिळविले.
आष्टी तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारीसह खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना सेंटर सुरु झाले आहेत. शुक्रवारी आष्टी तालुक्यासाठी रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचे धस यांना समजले. मग त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधत रेमडेसिवीर देण्याची विनंती केली. केंद्रेकर यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना रेमडेसिवीर धस यांना देण्याचे सांगितले. सुनील चव्हाण यांनी देखील त्याची अंमलबजावणी करत धस यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधत रेमडेसिवीर देतोय असे सांगितले. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता धस यांनी आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम, तालुका आरोग्य अधिकारी यांना विभागीय आयुक्त आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र पाठवण्याचे सांगितले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवून पत्र व्यवहार केला. मात्र रेमडेसिवीर औरंगाबाद येथून जाणे-आणने यात वेळ जाईल हे लक्षात येताच धस यांनी त्यांचे औरंगाबादचे उद्योजक मित्र शांताराम गाडेकर यांना रेमडेसिवीर घेऊन येण्याची विनंती केली. या प्रक्रियेदरम्यान रात्रीचे तीन वाजले. गाडेकर हे वेळ न दवडता औरंगाबाद घाटी रुग्णालयाचे गुणवंत यांच्याकडून रेमडेसिवीर ताब्यात घेत पहाटे साडेपाच वाजता आष्टीत दाखल झाले. आष्टी तालुक्याला शनिवारी पहाटेच हे रेमडेसिवीर घेऊन धस आष्टी ग्रामीण रुग्णालयात गेले. त्यांनी तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. राहूल टेकाडे यांच्याकडे हे रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोच केले. या सर्व प्रक्रियेत संपूर्ण रात्र गेली. यावेळी प्रशासनातील अधिकारी देखील रात्रभर जागे राहिले.
धस यांची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा-
गंभीर कोरोना रुग्णांकरीता रेमडेसिवीरची कमतरता जाणवू नये म्हणून सुरेश धस यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी आपणास रेमडेसिवीरची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन टोपे यांनी धस यांना दिले.