बीड - अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तिन वर्षांपूर्वी परळी तालुक्यात ही घडली होती.
हेही वाचा... धावत्या रिक्षात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाच्या तावडीतून सुटकेसाठी पीडितेची उडी
तीन वर्षांपूर्वी अंबाजोगाई येथील डॉक्टरांच्या समयसुचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. २०१२ साली परळी तालुक्यातील एका कुटुंबातील १० वर्षीय मुलगी सुटी निमित्त गावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या नात्यातील भगवान अप्पासाहेब दळवे याने पिडीतेला पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही अनेकदा सुट्यांमध्ये आरोपीने कधी चॉकलेट तर कधी पाण्यातून पीडीतेला गुंगीचे औषध देत, तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
२०१६ साली डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आरोपी थेट पीडीतेच्या शाळेत गेला आणि वडील आल्याचे कारण सांगून तिला बाहेर घेऊन गेली. त्यानंतर त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. अनेक ठिकाणी तिला नेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडीतेच्या पोटात दुखू लागल्याने घरातील सदस्यांनी तिला रुग्णालयात नेले. तपासणी दरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला विचारणा केली. त्यावेळी तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड: 'हैदराबाद एनकाऊंटर पॅटर्न महाराष्ट्रात अमलात आणा'
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पीडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान दळवे याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासल्यानंतर अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने भगवान दळवे याला दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.