बीड - ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे आणि खतं मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. वेळेत खत मिळत नसल्याच्या तक्रारी ठिकठिकाणी समोर येत आहेत. यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट ग्राऊंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी दुकानांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी सर्वसामान्य शेतकऱयांप्रमाणे शेतमाल विक्री करणाऱ्या दुकानात प्रवेश करून परिस्थिती जाणून घेतली.
मागील तीन-चार दिवसात औरंगाबाद शहरातून अनेक शेकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यासाठी स्वत: एका दुचाकीवर शेतमाल विक्री करणाऱ्या दुकानावर शेतकरी म्हणून गेलो, असे ते म्हणाले. आधी काही बियाणे मागितल्यानंतर युरियाची मागणी केली.
यावेळी दुकानदाराने युरिया नसल्याचे सांगितले. मात्र बाजूला लावलेल्या बोर्डावर युरियाचा किती 'स्टॉक' आहे, हे लिहिले होते. मी दुकानदाराला बोर्डवर लिहिलेल्या शिल्लक युरिया संदर्भात बोललो. यानंतर माझं ऐकून न घेता युरिया नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून दुकान सील करण्याच्या सूचना देताच दुकानदाराचे डोळे उघडले.
औरंगाबाद शहरातील नवभारत फर्टीलायझर या बियाणांच्या दुकानात युरियाची चढ्या भावाने विक्री होत होती. याची माहिती मिळाल्यानंतर स्वतः त्या दुकानावर शेतकरी म्हणून गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर जो अनुभव मला आला, तो वाईट होता, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. सामान्य शेतकऱ्यांशी दुकानदार कसे वागतात, याचा अनुभव मी घेतला,असे ते म्हणाले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा भुसे यांनी दिलाय.
तोंडाला शॉल बांधून दुकानावर गेलो. सध्या कोरोना असल्यामुळे तोंडाला देखील मास्क होता. त्या दुकानदाराने मला ओळखण्याचा प्रश्न नव्हता. काही बियाणे मागितल्यानंतर शेवटी युरिया द्या, असे म्हणताच त्या दुकानदाराने युरिया नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र दुकानातील बोर्डावर युरियाचा स्टॉक असल्याची नोंद होती. त्या बोर्डावरील स्टॉक संदर्भात मी त्या दुकानदाराला सांगू लागलो. मात्र त्याने माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही, असे दादा भुसे म्हणाले.