परळी (बीड) तालुक्यातील ग्रामीण भागातून व शहरातून राखेची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी अवैध राखेच्या वाहतुकीवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात त्यांनी पत्र देखील काढले होते. मात्र तरी देखील राखेची अवैध वाहतूक सुरूच आहे. दरम्यान अवैध राखेची वाहतूक करणाऱ्या 50 वाहनांवर ग्रामीण पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अवैध राख वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश
शहर व तालुक्यातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून राखेमुळे निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. याविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली. पण अवैध राखेची वाहतूक काही केल्या बंद होत नाही. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित विभागातील अधिकारी, पोलीस, महसूल प्रशासनाची संयुक्त बैठक बोलावून यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी राखेच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अवैध राख वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येत असून, 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा - वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीला भीषण आग