बीड - जिल्ह्यासह देशभरात 2012 मध्ये गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. मात्र, बाहेर आल्यानंतरही मुंडेने बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतची माहिती मिळताच बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सुदाम मुंडे यांच्या दवाखान्यावर छापा मारला. यावेळी काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंडे दाम्पत्यास २०१२ मध्ये एका अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, ही शिक्षा भोगत असताना काही महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परळीजवळ बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू केला. याबाबत आरोग्य विभागाकडे माहिती आली होती. त्यानंतर पाळत ठेऊन ही कारवाई करण्यात आली.
यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात हे स्वतः परळीत तळ ठोकून होते. शनिवारी रात्री उशीरा त्याच्या रुग्णालयावर छापा मारला. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत तब्बल सहा ते सात तास कारवाई सुरू होती. यावेळी गर्भपातासाठी आवाश्यक असणारे काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी सध्या सुदाम मुंडे यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.