बीड- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्हा काँग्रेसला अंतर्गत गट बाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हातील ज्येष्ठांच्या कुरघोडीवर स्पष्टीकरण देण्याएवजी काँग्रेसमधून एक मोठा गट बाहेर पडून त्याचे भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. या घडामोडी झाल्याच तर पालक मंत्री पंकजा मुंडे यांची ताकद वाढणार आहे. मात्र असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या दोन मतदार संघावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे राजकारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हळूहळू तापत आहे. कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे जोरदार राजकारण राज्यभरात सुरू आहे. काँग्रेसचे 'शिलेदार' म्हणून भूमिका बजावत असलेल्या एका बड्या नेत्याला जिल्ह्यातील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सातत्याने डिवचले. त्यामुळे पक्षावर नव्हे तर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त करत एक मोठा गट काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे.
..हे आहे नेमके कारण
जिल्ह्यातील माजलगाव येथील काँग्रेसच्या एका तालुका अध्यक्षांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याठिकाणी एका बड्या काँग्रेस नेत्याकडून प्रभारी काँग्रेस तालुका अध्यक्ष निवडल्या गेले. यावरून वरिष्ठांकडे ज्येष्ठ नेत्यांनी तक्रारी केल्या. या प्रकारामुळे काँग्रेसमधील काही नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजप प्रवेशाचा मुहूर्त केव्हा ठरतो, हे सध्या सांगता येणार आहे.