बीड - जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळाची दाहकता असह्य होत असल्याने अंबाजोगाई जवळील शेपवाडी येथील शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी अन्नत्याग केला आहे. सोमवारी त्यांच्या अन्न त्यागाचा चौथा दिवस होता. तर, निसर्गाची कृपा व्हावी तसेच प्रशासनाने दुष्काळी विशेष लक्ष द्यावे या अनुषंगाने त्यांनी हे उपोषण केल्याचे समजते.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील उत्तम भानुदास शेप या शेतकऱ्याने भीषण दुष्काळाला वैतागून हतबल झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून अन्न त्याग केला आहे. त्यांनी गावातील मारुती मंदिरासमोरच ठाण मांडले आहे. सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणीही शेप यांनी केली आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. यामुळे बळीराजा देखील चिंताग्रस्त आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, चारा देखील उपलब्ध होत नाही. गतवर्षी खरीप व रब्बीचे पीक वाया गेले. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी जगणार कसा? हिच चिंता उत्तमराव यांना सतावत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. तसेत वर्षभर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती नसतानाही त्यांना 5 हजार रुपये प्रति टन दराने चारा खरेदी करावा लागत आहे.
एकंदरीतच दुष्काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. या स्थितीकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे, या उद्देशाने उत्तमराव शेप यांनी शेपवाडी येथील गावातच मंदिरामध्ये अन्नत्याग केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उत्तमराव यांचे हनुमान मंदिरात अन्नत्याग उपोषण सुरूच असून सोमवारी त्यांच्या अन्न त्यागाचा चौथा दिवस होता. त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ देखील चिंताग्रस्त झाले असून, जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी अद्याप शेपवाडीकडे फिरकलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.