बीड(परळी वैजनाथ) - 'तू आमच्या लोकांना मदत का केली नाही?' अशी भांडणाची कुरापत काढून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना १५ फेब्रुवारीला सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
तुळशीराम परतवाड, असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिरसाळा येथील सांगळे चौकात एका स्वीट होमवर वाद सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर परतवाड व अन्य दोघे घटनास्थळी गेले. त्याठिकाणी विटा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील काहीजण दारू पिऊन भांडण करत होते. पोलिसांनी भांडण सोडवले व दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात आणले. याची माहिती मिळताच विटा येथील जगन्नाथ कोलते, फिरोज पठाण, अमोल भोसले हे सिरसाळा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस कर्मचारी परतवाड यांना 'तू आमच्या लोकांना मदत का केली नाही?' असे म्हणत मारहाण केली.
याप्रकरणी जगन्नाथ कोलते, फिरोज पठाण व अमोल भोसले या तिघांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.