बीड - शहरातील बायपास मार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यामध्ये बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर, 45 वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली.
बीड बायपासवरील चौकात दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीसह बारा वर्षीय मुलाला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अपघातातील मुलाची व 45 वर्षीय व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू -
ज्या वेळेत ही घटना घडली त्यावेळी कोणती वाहने बीड बायपास मार्गावरील त्या चौकातून गेली आहेत, याची चौकशी पोलीस करत आहेत. बीड शहरासह इतर ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्यामुळे पोलिसांना वाहनांचा शोध घेण्यासाठी अडथळा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.