बीड- कोरोनाने सध्या सर्वत्र हाहाकार माजविला असून दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत आहेत मृतांचा आकडा देखील वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील आडस येथे दिलासादायक बातमी असून येथील ९० वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीने कोरोनाला दोन वेळा हरविले आहे. त्यामुळे कोरोना हा शंभर टक्के बरा होणारा आजार असल्याने घाबरण्यासारखं नाही असं मोठ्या आत्मविश्वासाने ते 90 वर्षाचे आजोबा सांगतात .
याबाबत घडले असे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बीड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचं दिसून येतं आहे. मात्र याकाळात सर्वांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देणारी आणि मनातील कोरोनाची भीती घालविणारी घटना घडली आहे. आडस येथील पांडुरंग आत्माराम आगलावे ( वय ९० वर्ष ) यांना सहा महिन्यात दोन वेळा कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले. पण अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आणि अनेक संकटांचा मुकाबला करुन वाघासारखे काळीज कोरोनाला काय भीक घालणार!
असे झाले दोनदा पॉझिटिव्ह
पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर २०२० रोजी दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशीच पांडुरंग आगलावे यांना कोरोना ची लागण झाली होती. केज येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेऊन १० व्या दिवशी ते ठणठणीत होऊन आपल्या घरी परतले. यानंतर दि. ३० मार्च २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधित लस घेतली, सर्दी, खोकला असल्याने कोरोना चाचणी केली असता दि. ३ एप्रिल रोजी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. ही सहा महिन्यातील दुसरी वेळ होती. मात्र यावेळी कोरोनाने त्यांच्यावर पकड मजबूत केली. यावेळी त्यांचा HRCT ( एच आर सी टी ) स्कोर १८ होता. त्यामुळे श्वास ही घेता येत नव्हता तर घरातील व्यक्ती तर हे सर्व पाहून घाबरून गेलेले. मात्र पांडुरंग आगलावे हे जुन्या काळातील पहिलवान शरिरातील बळ संपलं तरी मन घट्ट असल्याने असा डाव टाकला की, कोरोनाला चीतपट करून लोळविले.
कोरोना घाबरणाऱ्यांवर अटॅक करतो
१४ व्या दिवशी दि. १७ एप्रिल शनिवार रोजी ते ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. दोन वेळा कोरोनाला चीतपट करणारे पांडुरंग आगलावे यांचा तरुणांनी आदर्श घेण्याची गरज आहे. कोरोना हा घाबरणाऱ्यांवरच जास्त अटॅक करतो त्यामुळे कोरोनाला न घाबरता सामोरे जा. याही पेक्षा कोरोना होऊ नये म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे यांसह शासन, प्रशासन करत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
इंदुरच्या ९७ वर्षीय शांतीबाईची कमाल
इंदुरच्या ९७ वर्षीय शांतीबाई दुबे यांनी कोरोनावर मात करुन वाढदिवशीच घरी प्रवेश केला आहे. त्यांच्या फुफुसात सुमारे ८० टक्के संक्रमण झाले होते. त्यानंतर त्यांना इंदुरच्या इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांना ऑक्सिजनवरही ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिद्द न सोडता कोरोनावर मात केली.
छत्तीसगडच्या आज्जींची मात
छत्तीसगडच्या कच्चांदूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये ७६ वर्षीय यास्मिन रहमान दाखल होत्या. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ७७ होती. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. १७ दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले. आता त्यांची तब्येत ठणठणीत आहे. तर दुसरीकडे, ७६ वर्षीय कस्तुरीबाई साहू यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा आजार आहे. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली.