बीड- शहरातील जालना रोड परिसरातील एका रुग्णालयाजवळील सिगारेट आणि बिस्किटांच्या गोदामातून तब्बल ९ लाखांचा माल चोरीला गेला आहे. ही घटना सकाळी गोदाम उघडल्यानंतर निदर्शनास आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मोढा भागात महावीर बेदमुथ्था या व्यापाऱ्याचे भुसार मालाचे होलसेल दुकान आहे. त्यांच्या मालकीचे जालना रोड परिसरात सिगारेट व बिस्किटांचे गोदाम आहे. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी गोदाम फोडून प्रवेश केला आणि तब्बल ९ लाख रुपये किमंतीचे सिगारेटचे बॉक्स लंपास केले.
सकाळी गोदाम उघडल्यानंतर हा प्रकार व्यापाऱ्याच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. यावेळी उपाधीक्षक भास्कर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अकलम शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, उपनिरीक्षक मिना तुपे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह ठसेतज्ज्ञ, श्वान पथक, आयबाईकचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
गोदामाच्या अजूबाजूच्या परिसराची पाहणी करुन पोलिसांनी चौकशी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जबरी चोऱया होत असल्यामुळे व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, एक चोरटा गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.