बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लग्नासाठी जात असताना दुचाकी आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. केज तालुक्यातील होळ गावाजवळ हा अपघात घडला. अजिंक्य दत्ता धस ( वय-२०) आणि महेंद्र भीमराव घुगे (वय-२०) दोघेही रा. होळ ता. केज) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
अजिंक्य आणि महेंद्र अंबाजोगाई येथे लग्नासाठी दुचाकीवरवरून जात होते. अंबाजोगाई शहराबाहेर दोन किलोमीटर अंतर पार करताच समोरून येणाऱ्या एका भरधाव जीपने (क्र.एम.एच.२४ व्ही. ४४८९) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला. तर महेंद्र घुगे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान प्रवाशांनी त्यास उपचारासाठी केज येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी युसुफवडगाव पोलीसानी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेमुळे होळ परिसरात शोककळा पसरली आहे.