बीड - जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसा करत असलेल्या नागरिकांना पायबंद घालण्यासाठी बीड पोलिसांनी कंबर कसली आहे. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग जवळच्या सीना नदी पात्रात अनधिकृत वाळू उपसा करत असलेले ट्रॅक्टर आणि जेसीबी टाकळसिंग येथे पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बीड : ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकळसिंग जवळच्या सीना नदी पात्रात छापा टाकून २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये बाळू तुकाराम देवकते, सुभाष बाळासाहेब वाल्हेकर, श्रीराम ज्ञानदेव जगताप, गणेश सुनील श्रीगंधे याच्यावर आष्टी पोलिसात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पथकाने 4 ट्रॅक्टर, 3 ब्रास वाळू किंमत 24 लाख 45 हजार रुपये आणि 2 जेसीबी किंमत 23 लाख, असा एकूण 47 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत, तर ६ वाहन मालक, अशा एकूण १२ जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी दिली.
हेही वाचा - सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे भरणार - धनंजय मुंडे