बीड - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. मागील 24 तासात बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. धारूर आणि वडवणी तालुक्यांमध्ये या घटना घडल्या. वडवणी तालुक्यातील देवळा येथील रामा शिंदे या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाची चिंता करत आत्महत्या केली आहे तर, दुसरे शेतकरी प्रभाकर मुंडे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे.
रामा बाबूराव शिंदे (वय ३७, रा. देवळा बु. ता. वडवणी) यांची जेमतेम अडीच एकर जमीन आहे. मंगळवारी रात्री जेवण करुन शिंदे कुटुंबीय झोपी गेले. बुधवारी पहाटे रामा यांच्या पत्नी शोभा झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी पतीला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आले. शोभा यांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी मुलीच्या लग्नाची चिंता तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सेवा सोसायटीच्या थकीत कर्जामुळे विष प्राशन केल्याचे सांगितले. शोभा यांनी पतीला तातडीने बीड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादऱ्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. शोभा शिंदे यांच्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रामा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील शेतकरी प्रभाकर साहेबराव मुंडे (४५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. मुंडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे जिल्हा बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते, त्यातच अतिवृष्टीमुळे शेतीतील कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले. अशा स्थितीत बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे या तणावातून प्रभाकर मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, व दोन मुली असा परिवार आहे.