बीड - शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या बीड जिल्ह्यात चार दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गुरुवारी 13 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजघडीला बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 एवढी झाली आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी नव्याने आढळलेले ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुर्डी १, नित्रुड ११ तर कुंडी १ असे आहेत. माजलगाव तालुक्यातील कवडगाव थंडी येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सदर कुटुंब शेतात राहायला गेल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यापूर्वी या कुटुंबाच्या संपर्कात अनेकजण आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १३ अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात अगोदरच १६ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यात आता या १३ची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उचार सुरू असलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा २९एवढा झाला आहे.
असे आहेत बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण -
एकट्या माजलगाव तालुक्यात १५ रुग्ण असून बीड ५ , केज २, पाटोदा ३, गेवराई २, वडवणी १, धारूर १ असे २९ सक्रिय रुग्ण आहेत. यापूर्वीच आष्टी तालुक्यातील पिंपळ येथील रुग्ण कोरोनमुक्त झाला आहे तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून ६ रुग्ण पुणे येथे हलवण्यात आलेले आहेत.