वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात लांडेवस्ती येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. राजेंद्र जिजाराम गोरसे (वय २६) असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
राधाजी गोरसे (रा.लांडे वस्ती, खंबाळा) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी व कुटुंबीयांनी जेवण आटोपले व घरातील एका खोलीत जिजाराम, त्यांची पत्नी लहान मुलगी तर दुसऱ्या एका खोलीत मुलगा राजेंद्र व सून मोनिका हे झोपी गेले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घराच्या पाठीमागच्या बाजूचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी राजेंद्र याच्या खोलीत प्रवेश केला. मात्र काही समजण्याच्या आत दरोडेखोरांनी राजेंद्र व मोनिका या दोघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. मारहाणीत राजेंद्र याच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मोनिका गंभीर जखमी झाली. शेजारच्या खोलीत दरोडेखोर धुमाकूळ घालत असताना राजेंद्रचे वडील जिजाराम हे जागे झाले. मात्र त्यांच्या खोलीच्या दरवाजाला दरोडेखोरांनी बाहेरून कडी लावून घेतली होती.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव आदींनी भेट दिली. तर तपासासाठी गोपाल जोनवाळ, डी.एस.गायकवाड, महिला कर्मचारी कविता पवार, राणी कापसे, ठाकरे, पी.जी.सुरडकर आदींनी घटनेचा पंचनामा केला. घटनेतील मृत राजेंद्र याचा चार महिन्यांपूर्वीच मोनिका हिच्याशी विवाह झाला होता. शिवाय राजेंद्र हा घरात एकुलता एक मुलगा होता.
चाकूचा धाक दाखवून लुटले
तालुक्यातील देवगाव (शनी) शिवारात ता.३० जून रोजी पहाटेच्या सुमारास गोरे वस्तीवर दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून १५ तोळे सोने व एक लाख रूपयांची रोकड लुटून नेल्याची घटना ताजी असताना आज दुसऱ्या घटनेत तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांची जलदगतीने तपास करुन आरोपींनी जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.