औरंगाबाद - तरुण मुलींना आपले सौंदर्य हे सर्वात प्रिय असते. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते. त्यात लांब केस असलेल्या मुलींनाही आपल्या केसांवर खूप प्रेम असते, असे असतानादेखील येथील एका 19 वर्षीय युवतीने आपले केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले. किरण गीते (वय १९) असे या मुलीचे नाव आहे. ही युवती येथील एमजीएम महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. किरणच्या मैत्रिणीला कॅन्सरचा आजार आहे. त्या आजारात किमोथेरपी घेताना तिच्या डोक्यावरील सर्व केस तिला काढावे लागले. यामुळे व्यथित झालेल्या किरणनेसुद्धा कॅन्सरग्रस्तांसाठी आपले केस दान केले.
मैत्रिणीमुळे किरण होती 'व्यथित' -
कॅन्सर झालेल्या आपल्या मैत्रिणीचे असे हाल पाहून किरणला नेहमी दु:ख व्हायचे. डोक्यावर केस हे मुलीसाठी सर्वात प्रिय असे असतात. मात्र, आपल्या मैत्रिणीचे केस आजारपणामुळे गेले. यामुळे ती व्यथित होती. आपण यामध्ये काही करू शकतो का, असा प्रश्न किरणला अनेक वेळा पडला. त्यातच १ वर्ष आधी कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान केले जाऊ शकतात, अशी माहिती किरणला मिळाली. तिने आणखी माहिती काढली असता कॅन्सर ग्रस्तांसाठी काही संस्था काम करतात याची माहिती तिला मिळाली. संस्थांच्या प्रमुखांची संवाद साधला असता या आजारामुळे ज्या व्यक्तींचे केस जातात त्यांना कृत्रिम केस लावले जाऊ शकतात, अशी माहिती तिला मिळाली. तसेच त्यासाठी केस दान केले जाऊ शकतात, हेही तिला माहीत झाले.
हेही वाचा - शरद पवारांसह मुख्यमंत्रीही आज दिल्लीत, सरकार स्थापनेचा घोळ मिटणार का?
माहिती मिळाल्यानंतर तिच्या डोक्यात वेगळी कल्पना येऊ लागली. आपले केस आपण जर दान केले तर कोणत्यातरी कॅन्सर रुग्णाला दिलासा मिळू शकतो, असे तिला वाटू लागले. त्यानुसार तिने आपल्या आई-वडिलांना आपल्या मनातील वेदना आणि कल्पना सांगितल्या. कुटुंबाने किरणच्या या इच्छेचा मान ठेवत तिला केस कापून दान कापण्याची परवानगी दिली. ज्या वयात मुली आपले सौंदर्य जपतात त्याच वयात किरणने आपल्या सौंदर्याचा विचार न करता आपले केस दान केले. या निर्णयामुळे मला समाधान मिळाल्याचे किरणने सांगितले आहे. तिच्या या निर्णयामुळे तिच्या कुटुंबालाही आनंद झाला आहे. तसेच ती शिकत असलेल्या महाविद्यालयात तिच्या मित्रांमध्ये देखील आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर