औरंगाबाद - खुलताबाद तालुक्यात एका विवाहितेने नऊ महिन्यांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संध्या निलेश लग्गड (वय-23) आणि श्रावणी (वय-9महिने) अशी या मायलेकींची नावे आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस याचा तपास करत आहेत.
मृत संध्या यांचा विवाह 2018 मध्ये खुलताबाद येथे राहणाऱ्या निलेश लग्गड यांच्यासोबत झाला होता. नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी मुलीला जन्म दिला होता. आता मुलीचे जावळ (बाळाचे पहिल्यांदा केस कापने) काढण्यासाठी संध्याला माहेरी, सिल्लोडला जायचे असल्याने त्यांनी आपल्या भावाला बोलावून घेतले होते. त्यांचा भाऊ त्यांना नेण्यासाठी आला असता, संध्या आणि भाची श्रावणी घरात नसल्याचे त्याला दिसले. बराच वेळ होऊनही संध्या परत न आल्याने त्याने तिचा शोध सुरू केला.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात.. चौघांचा मृत्यृ, पाच जखमी
शोध घेत असताना भावाला एका विहिरीजवळ श्रावणीचे दुपटे दिसून आले. विहिरीत पाहिले असता संध्या आणि श्रावणी पाण्यात पडलेले दिसले. दोघी मायलेकींना बाहेर काढून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषीत केले. संध्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.