औरंगाबाद - माझे सरकार आल्यावर मी सातबारा कोरा करेल. आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलो तेव्हा आधारकार्ड, सातबारा घेऊन आलो नव्हतो. त्यामुळे विनाअट नुकसानभरपाई द्यावी. १० कोटी अपुरी मदत आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करायचा विचारही मनात आणू नये, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
उद्धव ठाकरे वैजापूरमधील झोलेगाव येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. तुमच्यासाठी शिवसेना सदैव तत्पर आहे. बँकेने शेतकऱ्यांना नोटीस देऊ नये. जर, नोटीस दिल्या तर त्या जाळून टाकू आणि बँकेलाही सोडणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना गटनेते अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, रमेश बोरणारे आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा- राजकीय पक्षांनी पीक पाहण्याची नौटंकी करू नये - शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी