सिल्लोड (औरंगाबाद) - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात दोन हिंस्र प्राणी वावर करत असल्याचे समोर आले आहे. हे प्राणी लेणी परिसरात मुक्तपणे संचार करत असल्याचे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. यामुळे लेणी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हे प्राणी बिबट्या आहे, की वाघ याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
लेणी चार महिन्यांपासून बंद
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, चार महिन्यांची निवांत शांतता दरम्यान या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार बंद काळात लेणीत वाढल्याचे आता दिसून येत आहेत. शुक्रवारी रात्री दोन वाजून चार मिनिटांनी मध्यरात्री लेणीच्या प्रवेशद्वाराच्या तिकीट बुकिंग क्वॉर्टरवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक हिंस्र पाणी फिरताना दिसून आला. तसेच परत पायऱ्याजवळही एक हिंस्र प्राणी फिरताना दिसून आला आहे. मात्र, हा बिबट्या होता की वाघ याबाबत संभ्रम निर्माण झाले आहे.
वन विभागाचे आवाहन
या हिंस्र प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी दिली. तसेच हे हिंस्र प्राणी दिसले तर जोरात आवाज करा बॅटरीचा लाईट लावा अशी सूचनाही मांगदरेंनी दिली आहे. कारण लेणी ही जंगलात आहे. त्यामुळे तिथे वन्यप्राण्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत लेणी परिसरात फिरताना हातात काठ्या असू द्या तसेच अशा प्रकारचा कोणताही हिंस्र प्राणी नजरेस पडला तर जोरजोरात ओरडा जेणेकरून ते घाबरून लांब पळतील.