औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात भक्ती वाघिणीने ३ एप्रिलला पहाटे दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. मात्र तिच्यामुळेच एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ६ एप्रिलच्या रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना एका बछड्यावर तिचा पाय पडला होता. यामुळे पिलाला वेदना झाल्या. हा बछडा कमी दूध पीत होता. याच कारणामुळे दोन पांढऱ्या बछड्यांपैकी एका बछड्याचा शनिवारी मृत्यू झाला.
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या पट्टेरी रंगाची भक्ती वाघीण या जोडीने ३ एप्रिल रोजी दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला. भक्ती या वाघिणीची बछड्याना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र भक्तीने बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिच्यामध्ये मातृत्वाची भावना दिसून येत नसल्याचे आढळून आले. ती बछड्याची काळजी घेत नव्हती, तसेच ती स्वतः बछड्यांना दूध पाजत नसल्याचे दिसून आले. याच दरम्यान एका बछड्यावर भक्तीचा पाय पडल्याने तो जखमी झाला होता. त्यामुळे केअर टेकर यांना त्या बछड्यांना बाटलीबंद दूध पाजावे लागले होते.
शरीरात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू-
या पार्श्वभूमीवर उद्यान प्रशासनाने दोन्ही बछड्यांना आई पासून वेगळे करून दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवले होते. पाय पडलेल्या बछड्यावर प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. परंतु बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवार १० एप्रिलला बछड्याचा मृत्यू झाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी.तांबे, वन परिमंडळ अधिकारी ए.डी.तांगडे यांच्या समक्ष मृत्यू झालेल्या बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शरीरात रक्तस्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याच शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे.