औरंगाबाद - मास्कमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारीत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. कोविडमुळे दहा महिन्यांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना मास्कमुळे शाळा नको, असे म्हणावे लागत आहे.
मास्कमुळे येत आहेत अनेक अडचणी -
सतत मास्कच्या वापरामुळे शालेय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मास्कमुळे विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होणे, मास्कच्या बेल्टमुळे कान दुखणे, कानावर लाल चट्टे येणे, व्रण येणे त्यात खाज येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, अश्या अनेक समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. त्यात मास घातल्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात बसू देत नाही. मास्क खाली करू नका, असे सतत रेटा शिक्षक लावून धरतात. या कारणांमुळे शाळेतही मन लागत नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहे.
कोविडमुळे नऊ महिने होती शाळा बंद -
जानेवारी महिन्यापासून राज्यातील पाचवी ते आठवी शाळा सुरु करण्यात आल्या. कोरोनाचे सावट घोंगावत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, गेली नऊ ते दहा महिने शाळा बंद होत्या. ऑनलाइनपद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र, डिसेंबरपासून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या. त्यात काही नियम अटी घालून देण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. त्याचबरोबर सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी मास्क घालून शालेय शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, याच मास्कमुळे शाळा नको, असा सूर विद्यार्थ्यांकडून निघू लागला आहे.
शिक्षकांपुढे निर्माण झाली मोठी अडचण -
नऊ महिने ऑनलाईन शिक्षण दिल्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आव्हान शिक्षकांपुढे आहे. त्यातही विद्यार्थ्यांना आलटून-पालटून शाळेत प्रवेश दिला जातो. अशावेळी विद्यार्थ्यांना मास्कमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता शिक्षकांवर येणार ताण वाढला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन कोलमडल्याची भावना शिक्षक रामदास वाघमारे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मास्क घालने त्रासदायक झाले आहे. विद्यार्थी शाळेत आल्यावर सलग पाच तास मास्क वापरावा लागतो. काही विद्यार्थ्यांना दम्याचा त्रास आहे, अशा विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. सतत लावलेल्या मास्कमुळे कान दुखण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. श्वास गुदमरतो असल्याने काही विद्यार्थ्यांना अस्वस्थदेखील वाटते. तर काही विद्यार्थ्यांना मळमळदेखील होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होत आहे. अशा परिस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करायचा कसा, असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.
त्रास होत असला, तरी मास्क आवश्यक -
शाळेत आलेले विद्यार्थी मास्कमुळे त्रास होत आहे, तो काढू का, अशी सतत विचारणा करतात. मात्र, कोरोनाला हरवण्यासाठी मास्क हे एकमेव साधन आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हे पाळावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना याचा थोडा त्रास जरी होत असला, तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मास्क हा आवश्यक आहे. त्यामुळे शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत मास्क काढू न देण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली आहे. काही दिवसांत मास्क घालण्याची सवय विद्यार्थ्यांना होईल आणि त्यानंतर अडचणी सुटतील, असा विश्वास शिक्षक रामदास वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - रामोजी फिल्म सिटी १८ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी होणार खुली