औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चा आरक्षणाची लढाई नव्या जोमाने सुरू करणार असून, तुळजापूर येथून जागरण गोंधळ आंदोलन करून सरकार विरोधी एल्गार पुकारणार असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. सदावर्ते यांनी तात्काळ छत्रपती संभाजी राजे व सकल मराठा समाजाची माफी मागावी. अन्यथा सदावर्ते यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर गुन्हे दाखल करू, असा इशारा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षण याचिकेबाबत न्यायालयाने लावलेली स्थगिती काढेपर्यंत येत्या ११ तारखेला होऊ घातलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र, तरी देखील परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे, होऊ घातलेली परीक्षा प्रक्रिया बंद पाडणार, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना एका मराठा युवकाने मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारला होता. सत्तार यांनी त्या मराठा युवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असून, त्या घटनेचा आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने जाहीर निषेध करतो. लवकरच राज्यमंत्री सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. अन्यथा शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
हेही वाचा- तूर डाळीचे भाव कडाडले; 'हे' आहेत नवीन दर