औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतचा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
वेळापत्रक जाहीर झाल्याचे समाधान
दरम्यान न्यायालयाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले, याचे समाधान वटत असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. तातडीने सुनावणी सुरू व्हावी, जे विद्यार्थी आणि समाज बांधव आरक्षणाची वाट पाहत आहेत, त्यांना उत्तर मिळावे असेही यावेळी पाटील यांनी म्हटले आहे.
आरक्षणाबाबत राज्य सरकारने तयारी करावी
मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडायचा दिवस निश्चित झाला आहे, त्यामुळे सरकारने पूर्ण तयारी करावी, मराठा संघटनांचे आंदोलन हे न्यायालयाविरोधात नाही तर सरकारविरोधात आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आजच्या सुनावणीत झालेल्या निर्णयानुसार 8, 9 आणि 10 मार्चरोजी विरोधक बाजू मांडणार आहेत, तर 12, 15, 16 आणि 17 ला आरक्षण समर्थक आणि राज्य सरकार बाजू माडंणार आहेत. 18 मार्चला केंद्र सरकार आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा निर्णायक टप्पा सुरू झाल्याचे मत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलं आहे.