औरंगाबाद - राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क दुचाकीवर आल्याचे पाहायला मिळाले. कारने यायला उशीर झाला असता, म्हणून वेळ वाचवण्यासाठी दुचाकींचा आधार घेतल्याचं हरीभाऊ बागडेंनी सांगितलं.
भास्कर जाधव प्रतीक्षा करत असताना हरीभाऊ बागडे अचानक दुचाकीवर आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कार सोडून विधानसभा अध्यक्ष दुचाकीवर आल्याचं पाहून बागडेंची कार खराब झाली का? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर हरीभाऊ बागडेंनी स्मिथहास्य देऊन कारने यायला उशीर झाला असता म्हणून दुचाकीवर आल्याचे सांगितले.
बागडेंनी मोडला हा नियम
हरिभाऊ बागडेंच्या दुचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालक हा हेल्मेटविना गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच बागडे यांनीही हेल्मेट घातले नव्हते. एकीकडे राज्यभर हेल्मेटसक्ती असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्षच हेल्मेटविना प्रवास करत असल्याचे दिसले. हेल्मेट वापरायचा संदेश देणारेच असे हेल्मेटविना प्रवास करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव राजीनामा देण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी हरीभाऊ बागडे त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांची पाहणीसाठी गेले होते. कुंभेफळ येथे भेटण्याचे ठरल्याने भास्कर जाधव शिवसेना नेत्यांसोबत एका खासगी कार्यालयात गेले. हरीभाऊ बागडे यांना भास्कर जाधव आल्याचा निरोप देण्यात आला. हरीभाऊ बागडे खाजगी कार्यालयाकडे निघाले असता रस्त्यात रेल्वे रुळाजवळ फाटक लागलं होतं. रेल्वे येण्यास वेळ असल्याने दिवसभरातील कार्यक्रमला उशीर होईल, त्यामुळे हरीभाऊ बागडे यांनी कार सोडून पायी रेल्वे रूळ ओलांडला आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या दुचाकीवर बसून भास्कर जाधवांना भेटण्यासाठी आले.