औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी भावनिक संबंध आहेत. सामाजिक जाणिवेची संवेदना या विद्यापीठात आहे. विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याची गरज असल्याने विद्यापीठात अनेक बदल आगामी काळात घडवले जातील. तसेच विद्यापीठाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 व्या वर्धापन दिनी ते बोलत होते.
विद्यापीठाची स्थापना 1958 साली करण्यात आली. त्यावेळी लहान असलेले विद्यापीठ एका वटवृक्षासारखे वाढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून सुरू झालेल्या विद्यापीठात अनेक घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे कुलगुरू येवले यांनी सांगितले. यंदा ३ नवीन पुरस्काराची घोषणा त्यांनी केली. त्यामध्ये आदर्श शिक्षक, आदर्श अधिकारी-कर्मचारी, आदर्श पुरस्कार असे पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच त्याची नियमावली लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू म्हणाले. अनेक त्रुटी आहेत. मात्र, त्याच्यावर मात मिळवून विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू येवले म्हणाले. यावेळी इतिहासतज्ज्ञ रा. मोरवंचिकर यांना जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार दिलीप मालखेडे उपस्थित होते.