औरंगाबाद : शहरात 2022 मध्ये सर्व प्रकारची 918 वाहने चोरीला गेली. यातील 854 या दुचाकींचा समावेश आहे. चोरी झाल्यावर वाहनाचा शोध घेणे शक्य होत नसल्याचे देखील समोर आले आहे. चोरलेली दुचाकी ग्रामीण भागात विकली जाते किंवा तोडफोड करून सुटे भाग करून विकण्यात येतात. त्यामुळे 918 वाहन चोरींपैकी केवळ 293 वाहने पुन्हा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे रुग्णालय, मॉल, शैक्षणिक संस्था, रस्त्यावर लावलेली वाहने चोरीला जात आहेत. यामुळे शहरातील ठिकाणे दुचाकी चोरींचे हॉटस्पॉट बनले आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
रविवार वाहन चोरांसाठी शुभवार : वाहन चोरीचे प्रमाण वाढत असताना, चोरांसाठी रविवारी धंद्याचा म्हणजेच चोरीसाठी शुभ असलेला दिवस असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरात रविवारच्या दिवशी 135 दुचाकी चोरीला गेल्या आहे. सोमवार 132, मंगळवार 113, बुधवार 116, गुरुवार 119, शुक्रवारी 123 आणि शनिवारी 116 दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्वाधिक दुचाकींची चोरी झाली आहे. मागील वर्षभरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत 389 दुचाकींची चोरी झाली, तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत तब्बल 465 दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात सर्वाधिक 225 दुचाकींची चोरी झाली आहे. त्यानंतर सिडको एमआयडीसी, सिडको, पुंडलिक नगर, जवाहर नगर या पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो.
नागरिकांची बेफिकीरी नडली : वाहन चालवताना नागरिक गाडी लावताना योग्य काळजी घेत नसल्याने वाहन चोरी वाढली असल्याचे अहवालातून समोर आले आहे. गाडीचे लॉक खराब होणे, कोणत्याही चावीने गाडी चालू होणे, पार्किंगमध्ये अथवा अन्य ठिकाणी गाडी लावताना तिला लॉक न लावणे असे प्रकार अधिक प्रमाणात होत आहेत. त्यामुळे देखील वाहन चोरी होत आहे. वाहनतळ येथे लावलेले वाहन चोरी जात असल्याने त्याबाबत बैठक घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गाडीला योग्यरीत्या लॉक करणे, बाजारात अतिरिक्त मिळणारे कुलूप लावणे, जीपीएस लावल्यास आपले वाहन कुठे आहे ते कळेल आणि पोलिसांनाही वाहन शोधण्यास सोपे होईल; त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.