औरंगाबाद - ऐतिहासिक नगरी औरंगाबाद शहरात वाहन तळांची (पार्किंग) समस्या कायम आहे. महानगरपालिकेने वाहन तळांच्या कुठल्याही सुविधा आजपर्यंत निर्माण केल्या नसल्याने शहरात मुख्य रस्त्यांवर वाहन लावावे कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी मुख्य रस्त्यांवर लागणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक खोळंबा नेहमीचाच झाला आहे.
शहरात तीन ठिकाणीच अधिकृत व्यवस्था
औरंगाबाद शहर जस-जसे वाढत गेले, त्या प्रमाणात रस्त्यांवरील वाहने देखील वाढत गेली. मात्र, त्यामानाने पार्किंगची व्यवस्था झाली नाही. शहरात जुन्या शहरात प्रमुख बाजार पेठेत तीन ठिकाणी असलेले अधिकृत वाहन तळ वगळता इतर ठिकाणी व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही. त्यात गुलमंडी, औरंगपुरा आणि पैठणगेट येथे अधिकृत व्यवस्था उपलब्ध आहे. ती देखील म्हणावी तशी नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे नित्याचेच झाले आहे.
वाहन तळांअभावी मुख्य रस्त्यांवर नेहमीच गर्दी
औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा असला तरी शहर व्यवस्था मात्र पूर्ण कोलमडलेली आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने लावण्याची व्यवस्था कुठेही नाही. जालना रस्ता, सिडको, जळगाव रस्ता, शहागंज, गुलमंडी, पैठणगेट अशा मुख्य रस्त्यांवर गाड्या उभ्या केल्या जातात. दुचाकी रस्त्यांच्या बाजूला लावलेल्या असतातच, मात्र चार चाकी वाहन देखील रस्त्यावर उभी करावी लागतात. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढत चालली आहे. परिणामी वाहतूक खोळंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहन लावण्यास जागा नाही, त्यात बेशिस्तपणे वाहने रस्त्यात उभी केल्याने पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच.
शहरात ठरणार नवीन धोरण
महानगरपालिका प्रशासन आस्तिकुमार पांडेय यांनी वाहन तळ धोरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही अभ्यासकांना सोबत घेऊन पाच ठिकाणी 'पे-पार्किंग' व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दुमजली आणि तीन मजली वाहन तळ करण्यासंदर्भात नियोजन केले जात आहे. विशेषतः मुख्य बाजार पेठांमध्ये रस्त्यावर वाहन लागणार याची काळजी घेतली जाणार आहे. तसे काम सुरू झाले असल्याची माहिती शहरातील वाहन तळ अभ्यासक श्रीनिवास देशमुख यांनी दिली. रस्त्यावरील वाहनेच नाही तर रस्त्यांवरील चालणाऱ्या व्यक्तीला देखील सुरक्षितरित्या चालता यावे, अशी व्यवस्था करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. काही रस्ते 'स्ट्रीट फॉर पीपल' संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहनांच्या गर्दीची समस्या मार्गी लागेल, असे मत अभ्यासक श्रीनिवास देशमुख यांनी व्यक्त केले. शहराच्या वाहन व्यवस्थेबाबत वाहन तळ अभ्यासक श्रीनिवास देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.