औरंगाबाद - बिहार निवडणुकीत एमआयएमला पाच जागांवर विजय मिळाला. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल आनंदी आहे. मात्र, त्यांना मुस्लिम बहुल भागात यश मिळाले आहे. हे यश त्यांना मुस्लिम बहुल भागांच्या बाहेर मिळाले असते तर जास्त आनंद झाला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला चिमटा काढला. तसेच बिहार निवडणुकीत समोर आलेले निकाल धक्कादायक आहेत. पुन्हा एकदा ईव्हीएममुळे भाजपाला यश मिळाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, आम्ही अनेक वर्षांपासून ईव्हीएमबाबत न्यायालयीन लढाई लढत आहोत. मात्र, अद्याप यश मिळाले नाही, अशी खंतही आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
बिहार निवडणुकीत एक्झिट पोलचे निकष चुकले आहेत. खरेतर तेजस्वी यादव यांचे अभिनंदन केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला त्यांनी टक्कर दिली. प्रचार केला. यात त्यांचा निसटता पराभव झाला. खरेतर हा त्यांचा विजय आहे, असे मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - चिराग पासवान यांचा नितीश यांना हिसका! जाणून घ्या एलजेपीमुळे किती जागांवर झाला पराभव
राज्यात निवडणूक घेणे अनिवार्य -
बिहारसारख्या राज्यात निवडणूक घेतली जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुका प्रलंबित आहेत. खरेतर या निवडणुका थांबवता येत नाहीत. मात्र, त्या थांबवल्या गेल्या. ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेली स्थगिती दुर्दैवी आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - 'हा मोदी-नितीश कुमारांचा करिष्मा, एनडीएला पुन्हा बहुमत दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे अभिनंदन'
मराठा समाजासाठी नोकरी भरती प्रक्रिया थांबवणे चुकीचे -
मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असताना एका समाजासाठी थांबणे हा चुकीचा सिग्नल आहे. नोकरी देताना त्या पत्रात न्यायालयाला आधीन राहून नियुक्ती असेल, असे नमूद करून प्रक्रिया केली असती तरी चालले असते. मात्र, तसे झाले नाही. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही आंबेडकर म्हणाले.