औरंगाबाद - कन्नड येथे गुरुवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी 3 वाजताचा सुमारास तालुक्यात ठिकठिकाणी विजेचा कडकडाट, सुसाट वारा यामुळे वातावरण बदलले. सकाळपासून दमट झालेल्या वातावरणात नागरिक व्याकुळ झाले होते. दुपारी 3 च्या सुमारास तालुक्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषत: फळबागाचे जास्त नुकसान झाले.
उन्हाळा असल्याने पारा गेल्या काही दिवसापासून चढलेला होता. त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दुपार पासून ढगाळ वातावरण झाल्याने सुसाट वारे वाहू लागले आणि विजेचा कडकडाटात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाने वातावरणात मोठा बदल झाला.
तालुक्यातील चापानेर परिसरात मुसळधार वादळी पावसाने खेडा येथील शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाले. चापानेर परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. खेडा येथील शेतकरी बाबासाहेब सुधाकर जाधव यांच्या घरावरील पत्रे यावेळी उडून गेले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याचा संसार उघड्यावर पडला.